Friday, March 29, 2013

दुष्काळाची भयंकर स्थिती- जबाबदार कोण? निसर्ग की सरकार ??

दुष्काळाची भयंकर स्थिती 
                         आज सगळीकडे पाणी जपून वापरा ! हे ऐकायला मिळत आहे, हे नक्की कशासाठी? सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ? हो फक्त सामाजिक बांधिलकी साठी असेल तरी ते योग्यच आहे. कारण दुष्काळाने होरपळून निघालेली जनता,
ही विदर्भ, मराठवाडा आणि काही महाराष्ट्राचे इतर दुष्काळी भागांमध्ये मोठ्याप्रमाणावर आहे. हीच जनता नाईलाजाने आता शहरांकडे स्थलांतर करत आहे. नक्की ह्यामध्ये दोष कोणाचा ? निसर्गाचा की सरकारचा ??
नाही मी राजकारणाबद्दल काहीच बोलणार नाहीये, तो आपला प्रांत नाही कारण काहीही बोलले तरी शेवटी सगळे राजकारणी सारखेच. असो, आता ह्याप्रश्नांवर उपाय काय आहेत. ते आपण बघूया, पाण्याचा अपव्यय टाळा हे वारंवार सांगितले जाते ते योग्यच आहे.
                                                महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये, महानगरपालिकांमध्ये प्रत्येक घरासाठी अगदी मुबलक पाणी असते, त्यामुळे तेथील प्रत्येक लोकांना त्याची एकप्रकारे सवय झालेली असते अगदी साध्या साध्या गोष्टींवरून आपण लक्षात घेऊया. सकाळी उठल्यावर दात घासताना देखील नळाचे पाणी चालूच ठेवणारी मंडळी बरीच आहेत. मी प्रत्येकालाच दोष देतोय असे नाही पण आपण ह्या सगळ्या गोष्टींचा गांभीर्याने विचार करायला हवा ह्याचे अजून एक कारण म्हणजे परवाच मी एका व्यक्तीला भेटलो ती व्यक्ती पाण्याचे बोअरवेल असते ना ! त्या बोअरवेलच्या मोटारी बसविण्याचे काम करते, त्या काकांशी चर्चा करताना असे लक्षात आले, गेल्या १०-१२ वर्षांमध्ये बोअरवेलची खोली म्हणजेच पाण्याची जमिनीमधील पातळी १००-११० (feet) फुटांवरून १५०-२०० (feet) फुटांवर गेली आहे.  म्हणजेच पाण्याच्या पातळीमध्ये किती घट झाली आहे हे आपल्या लक्षात येईल. त्यासाठी अनेक महत्वपूर्ण उपाय करणे आवश्यक आहे. सरकार देखील अनेक योजना आणत असते परंतु त्या फक्त कागदावरच राहतात. "पाणी अडवा पाणी जिरवा" ह्यासारख्या बऱ्याच योजना आहेत. शेतकऱ्यांनी ह्याचा लाभ घेणे आवश्यक आहे.
चिमणी पाणी पिताना 
                                    ह्या सगळ्या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये जिथे मुबलक प्रमाणात पाणी आहे निदान रोजच्या गरजा भागवता येतील एवढे पाणी आहे अश्या लोकांनी आपल्यातले थोडे पाणी जनावरे, पक्षी, मुके प्राणी ह्यांसाठी पाण्याची सोय करणे गरजेचे आहे. यासाठी वेगळे काही करण्याची आवश्यकता नाही फक्त एखादे भांडे, पत्र्याचा डबा नाहीतर अगदी नको असलेले प्लास्टिकचे डब्याचे झाकण अश्या कोणत्याही माध्यमातून आपण पाणी पक्षांसाठी अंगणामध्ये ठेऊ शकतो. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हजारो पक्षी केवळ पाण्याविना मरण पावतात. खरोखरच प्रत्येकाने ह्या परीस्थितीचा गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.

टीप:- comment box मध्ये आपले मत बिनधास्तपणे नोंदवा. आणि प्रत्येकाने नक्की share करा.   
 

No comments:

Post a Comment